नवीन ठाणेदार सदाशिव ढाकणे ॲक्शन मोडमध्ये; ‘नो पार्किंग’ मोहिमेमुळे पुलगावची वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर

Mon 15-Jun-2026,05:37 AM IST -07:00
Beach Activities

नवीन ठाणेदार सदाशिव ढाकणे ॲक्शन मोडमध्ये; ‘नो पार्किंग’ मोहिमेमुळे पुलगावची वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर

पुलगाव (प्रतिनिधी) : युसूफ पठाण

पुलगाव पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांनी पदभार स्वीकारताच शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अवैध व्यवसायांवरील कारवाईसोबतच ‘नो पार्किंग’ क्षेत्रात उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांविरोधातही कठोर पावले उचलली जात आहेत.

शहरातील प्रमुख चौक, हॉटेल परिसर तसेच बसस्थानक परिसरात अनेक वर्षांपासून बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या समस्येची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांनी विशेष पथकाची नियुक्ती करून ‘नो पार्किंग’ क्षेत्रात उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

पोलीस प्रशासनाच्या मते, या मोहिमेचा उद्देश केवळ दंडात्मक कारवाई करणे नसून वाहनचालकांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती करणे आणि शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व सुरळीत करणे हा आहे.

या कारवाईत पोलीस अमलदार विनोद राघटाटे, संदीप बोरवन, अजय अनंतवार, सोमेश गंथाडे, पंजाब राठोड तसेच वाहतूक अमलदार कमलाकर सोनारकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.

पुलगावकरांनीही पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले असून, या मोहिमेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.